…तरच आशियाई कपमध्ये सहभागी होणार, BCCI ची पाकिस्तानविरुद्ध स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई चषक २०२० या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे दिल्याने ही स्पर्धा पाकिस्तानातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. असे असताना भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत या स्पर्धेत खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यावर आशियाई क्रिकेट परिषद काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, BCCI ने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असल्यास स्पर्धेत खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर आयसीसी स्पर्धां वगळता भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने झालेले नाहीत. आता आशियाई चषक २०२० मध्ये हे दोन देश आमनेसामने येतील अशी शक्यता होती मात्र बीसीसीआय ने पाकिस्तानात खेळण्यास नकार देऊन ही शक्यता फेटाळून लावली आहे. काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशांत असणारी तणावपूर्ण परिस्थिती पाहता हा निर्णय अपेक्षित असाच आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार पर्यंत बीसीसीआयच्या निर्णयाची जून २०२० पर्यंत वाट पाहणार असून त्यानंतर आशियाई चषक पाकीस्तानात होणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. बीसीसीआय च्या भूमिकेमुळे आता पाकिस्तानमध्ये आशियाई चषक होणार की नाही, याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेला घ्यावा लागणार आहे कारण भारतासारखा क्रिकेटच्या क्षेत्रातील मोठा देश यात भाग न घेणे आशियाई क्रिकेट परिषदेला परवडणारे नाही.

Visit : Policenama.com