WB Election Results : ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयाबद्दल आ.रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शक्तिशाली भाजपाला धोबीपछाड देत तृणमूलने जोरदार मुसंडी मारली आहे. बंगालमध्ये तृणमूलने 200 पेक्षा जास्त जागा जिंकत असल्याचे दिसत असून भाजपा 100 च्या आतच दम तोडताना दिसत आहे. या निकालावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. समोर कितीही बलाढ्य शक्ती असली, तरी त्यांच्याशी लोकांच्या साथीने त्याच आक्रमकपणे लढा दिल्यास त्यांनाही पराभूत करता येते, याचे उदाहरण देशातील सर्वच पक्षांसाठी ममता बॅनर्जीनी दाखवून दिले आहे. या विराट विजयाबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचे आणि ममता दिदींच मनःपूर्वक अभिनंदन, असे पवार यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अभिनंदन केलं आहे. जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि कोरोना विरुद्ध लढा देण्याचे काम एकजुटीने करू, असे आवाहन पवार यांनी केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. निवडणूक प्रचारातही भाजपाने पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. तृणमूलने भाजपला जबर टक्कर देत धोबीपछाड दिले आहे.