पुण्यातील अमली पदार्थाच्या कारवाईनंतर, ATS चे बंगलोर, गोव्यात छापे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नववर्षाच्या आणि 31 डिसेंबर 2020 पार्टयांसाठी दिल्लीहून आणलेले 34 किलो 400 ग्राम वजनाचे चरस लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले. याची किंमत अंदाजे 1 कोटी 3 लाख 64 हजार असून पोलिसांनी दोघांना अटक केली होती. आता या गुन्ह्याचा पुढील तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसने या गुन्ह्याचा तपास सरु केला असून एटीएसच्या पथकाने इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी बंगलोर आणि गोवा येथे छापे टाकले आहेत.

पुणे लोहमार्ग पोलिसांनी ललीतकुमार दयानंद शर्मा (वय-49) आणि कौलसिंग रुपसिंग उर्फ भारद्वाज (वय-40) यांच्याकडून 34 किलो चरस जप्त केले होते. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथक विक्रोळी युनिट मुंबई हे करत आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी जप्त केलेला अंमली पदार्थ हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यात आणला होता. गुन्ह्यातील इतर आरोपींचा हिमाचल प्रदेशात शोध घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहेत.पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासात या गुन्ह्याचे नेटवर्क कुल्लु येथे असल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असून याची पाळेमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यात असल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, एटीएसच्या चरकोप युनिटने 31 डिसेंबर 2020 रोजी विजयकुमार सिंग (वय-35) आणि सुरज शेलार (वय-39) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 564 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी विजयकुमार याने पुण्यात पकडण्यात आलेल्या ललीतकुमार शर्मा याच्याकडून दोन किलो चरस विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. तसेच या गुन्ह्याचे मुख्य नेटवर्क देखील हिमाचल प्रदेशातील कुल्लु हेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

राज्यातील 12 गुन्हे एटीएसकडे
महाराष्ट्रातील जालना, बीड, चंद्रपूर, नागपूर, पुणे आणि धुळे या जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले 12 गुन्हे तपाासाठी एटीएसकडे सोपवण्यात आली आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.