औरंगाबाद : पतीचे गुपचूप उरकले अंत्यविधी, पत्नी अन् मुलगा गोत्यात, जाणून घ्या प्रकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेने आपल्या मुलाच्या मदतीने दारुड्या पतीची हत्या केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथे गुरुवारी (दि. 13) रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर आरोपी मायलेकरांनी कोणालाही न कळवता गुपचूप मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलीसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली. याप्रकरणी करमाड पोलिसांनी दोघानाही अटक केली आहे.

नागुसिंह झंडूलाल नागलोत (वय 46 ) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. भागाबाई नागुसिंग नागलोत आणि मुलगा सूरज नागलोत असे अटक केलेल्या मायलेकांची नावे आहेत.

करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नागुसिंग 13 मे रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर पती, पत्नी आणि मुलगा यांच्यात भांडणास सुरुवात झाली. पतीने शिवीगाळ केल्यानंतर पत्नीने आणि मुलाने दारुच्या नशेत असणाऱ्या नागुसिंग यांना लाकडी दांड्यांनी मारहाण मारहाण केली. मारहाणीत नशेत असलेल्या नागुसिंह याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी मायलेकांनी मृत पतीला पलंगावर नेऊन ठेवले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला घरी बोलावून नागुसिंग हे दारूच्या नशेत बेशुद्ध झाल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टरांनी नागुसिंग यांना मृत घोषित केले. यांनतर आरोपी पत्नी अन् मुलगा कोणत्याही नातेवाईकांना न बोलावता परस्पर अंत्यसंस्कार उरकून टाकले. त्यामुळे संशय बळावत गेल्याने पोलिसांनी आरोपी मायलेकाची कसून चौकशी केली. पोलीस चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.