औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं ही जनतेची भावना – शिवसेना नेते एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात औरंगाबादच्या नामकरणावरून राजकारण रंगत असून, औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीही औरंगाबादच्या नामकरणारवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे ही जनतेची भावना आहे, सरकारला जनतेच्या भावनेनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे या प्रकरणातही राज्य सरकार जनतेच्या भावनेप्रमाणे निर्णय घेईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

या दरम्यान, कोल्हापुरातील रा. शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकार तातडीने धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगतिले. राज्याच्या विकासाला बळ देण्यासाठी एकसमान बांधकाम नियमावलीचा निर्णय सरकारने घेतला. यापुढेही असे विकासाला पूरक असणारे अनेक निर्णय घेण्यात येतील. राज्यात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रमाणे राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक करण्याची सरकारची भूमिका आहे. शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मिलच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत प्रक्रिया करण्यात येईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून स्मारकाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे का असे पत्रकार बैठकीत प्रश्न विचारले असता त्यावर मंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे कार्यकर्ते हे लढाऊ आहेत. त्यामुळे त्यांची घुसमट वगैरे काहीही होत नाही. तसेच कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ, रंकाळा सुशोभिकरण, तीर्थक्षेत्र आराखडा, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, पन्हाळा येथे लेझर शो यासह आवश्यक सर्व प्रकल्पांना निधी देण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव पाठविल्यास त्याबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.