नगर जिल्ह्यातील 12 मतदार संघात सरासरी 64 टक्क्यांहून अधिक मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून पावसाच्या सावटाखालीही सकाळच्या सत्रात मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर पावसाने विश्रांती दिल्याने मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाराही मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. अंतिम आकडेवारी मिळण्यास रात्री उशीर होण्याची शक्यता आहे.

सलग दोन दिवस जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने मतदानाच्या दिवशी मतदार बाहेर पडतील का, याची चिंता होती. मात्र, आज पावसाने सायंकाळपर्यंत विश्रांती घेतल्याने निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. विविध मतदानकेंद्रांवर जिल्हा निवडणूक प्रशासनाने चांगली सुविधा केल्याने मतदान साहित्यास कोणताही फटका बसला नाही. त्यामुळे प्रत्येक केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सकाळच्या सत्रात मॉक पोल (अभिरुप मतदान) वेळी १६ बॅलेट युनिट, २४ कंट्रोल युनिट आणि ६४ व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली. प्रत्यक्ष मतदानावेळी बाराही मतदारसंघात १३ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट आणि ११२ व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली. मात्र, निवडणूक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केल्याने मतदारांची गैरसोय टळली.

शहरी भागात मतदानाचा वेग काहीसा मंदावला असल्याचे चित्र असले तरी ग्रामीण भागात मात्र युवा मतदार, नवमतदार, महिला आणि ज्येष्ठांचा मतदानासाठीचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी ११ वाजेपर्यंत १८ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर नवमतदार आणि महिलांची गर्दी पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सरासरी अंदाजे ४९.२० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील मतदानाची अंदाजित सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे- अकोले मतदारसंघ- सरासरी ६७.७३ टक्के, संगमनेर मतदारसंघ – ६९.३० टक्के, शिर्डी- ६४.२५, कोपरगाव – ६९.४०, श्रीरामपूर – ६२.१४, नेवासा – ७२.६४, शेवगाव – ६२.९९, राहुरी – ६३.१८, पारनेर – ६४.२०, अहमदनगर शहर-५२.६९, श्रीगोंदा- ६३.३८ आणि कर्जत-जामखेड – ७१.३४ टक्के.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी हे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी थेट संपर्क करुन निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरु ठेवण्याबाबत सूचना दिल्या जात होत्या. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान सुरळीत ठेवण्याबाबतची कार्यवाही गतीने केल्यामुळे कोठेही फारशी अडचण आल्याचे जाणवले नाही.

दरम्यान बाराही मतदारसंघात जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने सखी मतदारसंघ आणि आदर्श मतदारसंघाची रचना करण्यात आली होती. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील दिल्लीगेट येथील अ.ए. सो. चे डी एड कॉलेज व स्टेशन रोडवरील आयकॉन पब्लिक स्कूल या दोन ठिकाणी सखी मतदान केंद्रावर आकर्षक रांगोळ्या, सेल्फी पॉइंट, लोकशाहीला पत्र, मतदानाची शपथ, मतदार स्वाक्षरी अभियान, सखींच्या मुलांसाठी खेळणी, सौंदर्यप्रसाधने आरशाच्या माध्यमातून सजवण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते मतदारदूत डॉ अमोल बागूल यांनी या दोन्ही केंद्रावरील सजावट केली आहे. पोलीस कर्मचारी ते मतदान केंद्राध्यक्षपर्यंत मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांनी सांभाळली.

“होय मी मतदान केले आणि ही लोकशाहीचा स्माईल आहे.. ” असं वाक्य लिहिलेला आरसा सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.भल्यामोठ्या पोस्ट कार्डवर मतदानाची लिहिलेली शपथ तसेच मतदार स्वाक्षरी अभियानात ‘माझी सही माझे मत’ म्हणून महिलांनी केलेला संकल्प, त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या विविध कविता, सुविचार देखील सखी मतदान केंद्रावर लावण्यात आलेले होते. दिव्यांग मतदारांसाठी मतदान सहायक, व्हीलचेअर्सची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांना थेटपणे मतदान केंद्रांवर येऊन मतदान करणे सोईचे झाल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळाले.

Visit  :Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like