राम मंदिराच्या बांधकामासाठी मिळालेले 22 कोटी रुपयांचे चेक झाले बाऊन्स, ट्रस्टनं सांगितले ‘हे’ कारण

अयोध्या : अयोध्यामध्ये राम जन्मभूमी मंदिर बांधकामासाठी रक्कम जमवण्यासाठी समर्पण निधी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात मिळालेले 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, या चेकची एकुण रक्कम 22 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. याबाबत जेव्हा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी या पाठीमागे तांत्रिक कारण सांगितले आहे.

इतक्या मोठ्या रक्कमेचे चेक बाऊन्स झाल्यानंतर आणि त्या पाठीमागे तांत्रिक कारण समोर आल्यानंतर एक टीम बनवण्यात आली आहे. ही टीम त्या दात्यांशी संपर्क करत आहे, ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्र यांच्यानुसार जे चेक बाऊन्स झाले आहेत त्यांच्या पाठीमागे काही ना काही तांत्रिक कारण आहे. ज्या दात्यांचे चेक बाऊन्स झाले होते, त्यापैकी काहींनी नवीन चेक दिले आहेत, त्यापैकी काही चेक क्लियर सुद्धा झाले आहेत. तर अन्य लोकांशी संपर्क केला जात आहे.

5 हजार कोटी रुपये जमण्याचा अंदाज
राम जन्मभूमी मंदिर बांधकामासाठी 15 जानेवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण देशात समर्पण निधी अभियान राबवण्यात आले होते. या दरम्यान 9 लाख कार्यकर्त्यांनी 1,75,000 गट बनवून घरोघरी जाऊन 10 कोटी कुटुंबांशी संपर्क केला. त्यांच्याकडून जमा रक्कम 38,125 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यात आली. या दरम्यान समन्वयासाठी 49 नियंत्रण केंद्र बनवण्यात आली. तर दिल्ली येथील मुख्य केंद्रावर दोन चार्टर्ड अकाऊंटंटच्या देखरेखीत 23 लोकांच्या टीमने संपूर्ण भारतातून जमा रक्कम आणि डिपॉजिट रक्कमेवर देखरेख केली. या संपूर्ण अभियानादरम्यान 5000 कोटीपेक्षा जास्त रक्कम श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, सध्या ऑडिट होणे बाकी आहे.