अयोध्येत सध्या बाहेरच्यांना प्रवेशबंदी, लॉकडाउनजन्य परिस्थिती

पोलीसनामा ऑनलाइन – ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. या कार्यक्रमाला २०० पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले आहेत. अयोध्येत ३ ऑगस्टपासून ओळखपत्राशिवाय बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

अयोध्येमधील वाढता कोरोनाचा संसर्ग तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेसाठी शहरात बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. यासाठी अयोध्या परिसरात मोठ्या प्रमाणात फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आला आहे. बाहेरुन येणारी वाहने महामार्गावरील बसेसचीही तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या ओळख पत्राची पाहणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील लोकांचीही चौकशी सुरु असून सरकारी ओळखपत्र पाहूनच त्यांना सोडण्यात येत आहे. हे निर्बंध ४ आणि ५ ऑगस्ट पर्यंत कायम राहतील.

राममंदिर विश्वस्त ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुणे मंडळींची यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. या कार्यक्रमाला २०० पाहुणे उपस्थित राहणार असून साधू संत, नेते, विहिप- न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील ५० विशेष अतिथी सहभागी होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती अयोध्येतील हॉटेल्स, धर्मशाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर ते बारीक लक्ष ठेवून आहेत.