मोदी सरकारमधील ‘आयुष’ मंत्री श्रीपाद नाईक यांना ‘कोरोना’चं संक्रमण, म्हणाले – ‘संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करावी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचे संकट वाढतच चालले आहे. दररोज हजारोच्या संख्येने लोक कोरोना संक्रमित होत आहेत. आता मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाईक कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह आढळले आहेत. श्रीपाद नाईक यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी आज कोविड-19 टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. मी होम आयसोलेशनमध्ये आहे. जे लोक मागच्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी तपासणी करावी, आणि काळजी घ्यावी.

श्रीपद नाईक यांच्या अगोदर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा कोविड-19 ने पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आतापर्यंत देशात 23 लाखांपेक्षा लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याशिवाय 46 हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 16 लाखांपेक्षा लोकांवर उपचार करण्यात आले आहेत.