‘आयुष्यमान भारत’ला फेक वेबसाईट चे ग्रहण ; ८९ जणांवर गुन्हा

नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था  – भारतातील ४० टक्के लोकांना आरोग्य विम्याचे कवच प्रदान करणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेला फेक वेबसाईट आणि फेक मोबाईल अॅप्सचे ग्रहण लागले आहे. आयुष्यमान भारत योजने बद्दल भारतभर फेक मोबाईलअॅप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना विचलित करणाऱ्या ८९ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत हि भारतीयांच्या आरोग्य विम्याची महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात केला आहे. मोदींच्या या योजनेच्या माध्यमातून ४० टक्के लोकांना आरोग्य विम्याचे कवच दिले जाते. आर्थिक विवंचनेमुळे आपल्या आरोग्याच्या प्रश्नांवर पैसे खर्च करण्याची ऐपत नाही अशा सर्व लोकांना भारत सरकारच्या वतीने ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. या योजनेचा भारतातील १० कोटी कुटुंबाना लाभ दिला जाणार असून १२ हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षण अडकणार कायद्याच्या पेचात ?

परंतु या योजनेची भव्य व्याप्ती कोणाला कोणत्या गोष्टीसाठी आकर्षित करेल या बद्दल काही सांगता येत नाही. कारण या योजनेच्या नावाखाली अनेक खोट्या मोबाईल अॅप्सचा आणि वेबसाईटचा सुळसुळाटच भारतभर मजला आहे. या खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. काही वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन शुल्क आकारण्यात आले आहे तर काही मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून ग्रीन कार्ड वाटण्याचा प्रकार केला गेला आहे.  गरिबांना करण्यात आलेल्या फसवणुकीमुळे  त्या सर्व वेबसाईट आणि मोबाईल अॅप्सच्या निर्मात्यांवर भारत सरकारच्या  राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आयुष्यमान मित्र पदाची भरती काढण्यात आली होती. परंतु त्या संदर्भात हि या फेक वेबसाईटने गोंधळ उडवून दिला असून त्यामुळे आयुष्यमान मित्र  नेमण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक सरकारी  रुग्णालयात या भरती संदर्भात व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे या भरतीसाठी  आणि योजनेच्या माहितीसाठी नागरिकांनी https://www.abnhpm.gov.in/ या वेबसाईट वर संपर्क साधावा किंवा १४५५५ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.