धक्कादायक ! कुस्तीच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर बबीता फोगाटच्या बहिणीने केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा जगतासाठी अतिशय धक्कादायक बातमी येत आहे. कुस्तीच्या फायनल मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला पहिलवान रितिकाने आत्महत्या केली आहे. रितिका बबीता फोगाट, गीता फोगाटची मामे बहिण होती. तिने सोमवारी रात्री बलाली गावात गळफास घेऊन आत्महत्या केली. मीडिया रिपोर्टनुसार, रितिकाने 12 ते 14 मार्चपर्यंत राजस्थानच्या भरतपुरच्या लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्तरीय सब ज्यूनियर, ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती टुर्नांमेंटमध्ये भाग घेतला होता.

14 मार्चला फायनल मॅच खेळवण्यात आली होती, ज्यामध्ये रितिका एका गुणाने मॅचमध्ये पराभूत झाली होती. या पराभवानंतर तिला धक्का बसला होता आणि नंतर 15 मार्चला रात्री सुमारे 11 वाजता बलाली गावातील घरात पंख्याला ओढणीचा गळफास लावून तिने आत्महत्या केली.

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील जैतपुर गावात राहणारी 17 वर्षांची रितिका आपले काका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर पहिलवान यांचे गाव बलाली येथील कुस्ती अकॅडमीत सुमारे 5 वर्षापासून सराव करत होती. 53 कि.ग्रॅ. वजनी गटात राज्यस्तरावर एक गुणाने पराभूत झाल्याने रितिकाला प्रचंड धक्का बसला आणि तिने हे भयंकर पाऊल उचलले. तिने यापूर्वी सुमारे 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.