मी राजीनामा दिला नाही, पक्षश्रेष्ठी देईल ती जबाबदारी स्वीकारणार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद, विधिमंडळ नेते आणि प्रदेशाध्यक्ष अशी तिहेरी भूमिका सांभाळणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केल्याचे वृत्त काल आले होते. त्यासाठी थोरात यांनी दिल्लीवारी केल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र खुद्द बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी या वृत्त फेटाळून लावले आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र पक्षश्रेष्ठी देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आले होते. राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावे अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी थोरात यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही चर्चा फेटाळून लावली आहे. तसेच ही बातमी कुठून आली हे माहित नाही. या बातमीचा स्रोत शोधावा लागेल, असेही ते म्हणाले.

तसेच पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल आणि जी जबाबदारी माझ्यावर दिली जाईल, ती स्वीकारण्यास मी तयार असेन, असे थोरात यांनी सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी. नवे नेतृत्व समोर आणावे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, असेही थोरात म्हणाले. सध्या थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.