‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महेश कोठारे निर्मित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात (ban-mahesh-kothares-dakkhancha-raja-jyotiba-marathi-serial) सापडली आहे. मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत मालिका बंद करावी, तसेच कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करावी, अशी मागणी गुरव समाजातील पुजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. तसेच खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. ही मालिका 23 ऑक्टोंबरला प्रदर्शित झाली आहे.

मालिकेतील माहिती पट चुकीचा दाखवून भावना दुखवल्याबद्दल व खोटी माहिती प्रसारित करून फसवणूक केल्याबद्दल कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करावी, असे निवेदन गुरव समाजाच्या वतीने सरपंच राधाताई बुणे यांना देण्यात आले आहे. उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी या मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

तर ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी मालिकेतील चुकीची माहिती दाखवली तर ती खपवून घेणार नाही. तसेच पुढे असे झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सामाजिक कार्यकर्ते आनंदा लादे यांनी जोतिबा देवाचा इतिहास हा केदार विजय ग्रंथानुसार मालिकेत दाखवला नाही, त्यामुळे विटंबना झाल्याचा दावा केला आहे.

जोतिबा उत्कर्ष समितीचे म्हणणे काय ?
मालिका ही पौराणिक स्थरावर असावी. मात्र मालिकेतील भाषाशैली ही निंदनीय असल्याचे समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे यांनी म्हटले आहे. तर मालिकेत भ्रमनिरास झाला असून मालिका विचार विनिमय करून सुरू करावी असे मत समितीचे सचिव संदिप दादर्णे यांनी व्यक्त केले आहे. महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचा आरोप ग्रा पं.सदस्य लखन लादे यांनी केला आहे.