संभाजी भिडेंना महाराष्ट्रात भाषण बंदी करावी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – मनोहर भिडे ऊर्फ संभाजी भिडे यांच्यावर सांगली, सातारा परिसरात व भीमा कोरेगाव येथे घडलेल्या दंगलीत हात असल्याचा आरोप आहे. संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांनी जाणीवपूर्वक लोकांमध्ये जातीयता पसरवून, लोकांना भडकवून दंगली घडविल्याचा आरोप केला होता. त्याबाबत त्यांना अजूनही अटक झालेली नाही. त्यांचा या दंगलीत सहभाग नाही, याबाबत कोणता अहवाल आला नाही. त्यामुळे भिडे यांना महाराष्ट्रात भाषणे करण्यास बंदी घालण्याची मागणी काॅंग्रेसच्या मागासवर्गीय विभागाने एका निवेदनात केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मनोहर भिडे यांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सभा व व्याख्याने होत आहेत. या व्याख्यानांतून ते तरुणांची माथी भडकविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या भाषणातून जाती – धर्मामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असते. तसेच कायदा सुव्यवस्थाही बिघडते.

या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्रात कुठेही भाषण किंवा व्याख्याने देण्यास बंदी घालण्यात यावी. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात शांतता व सलोखा टिकण्यास मदत होईल, असे या निवेदना म्हटले आहे. दरम्यान, मुंबई येथील भिडेंच्या भाषणादरम्यान विरोध करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची सुटका करावी अशी मागणी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देऊन केली आहे. या वेळी प्रमुख पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.