येत्या 3 दिवसांत बँकेची कामे करुन घ्या, नाही तर रखडतील कामे; एप्रिलमध्ये फक्त 17 दिवस कामकाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना असून बँकेसह वित्तीय क्षेत्रासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व बँकांना 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्षासाठी आपले खाते बंद करावे लागते. त्यामुळे बँकेशी संबंधित काही कामे असतील तर ती लवकरच करुन घ्या. बँकेची कामे कामे करुन घेण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले आहेत. या कालावधीत तुम्ही बँकेची कामे करुन घेतली नाहीत तर तुम्हाला एक आठवडा थांबावे लागले. आर्थिक वर्षाच्या महिन्यातील हा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक बँकांना सुट्ट्या आहेत.

एप्रिलमध्ये 17 दिवस कामकाज

एप्रिल 2021 मध्ये बँकांचे कामकाज फक्त 17 दिवस चालणार आहे. बँका 27 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान दोनच दिवस सुरु राहणार आहेत. 27 मार्चला चौथा शनिवार आहे तर 28 तारखेला रविवार आहे. त्यामुळे या दोन दिवशी बँका बंद राहणार आहेत. 29 तारखेला होळी असल्याने बँका बंद राहणार आहेत. 30 मार्च रोजी पाटण्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत. 31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी बँका सुरु राहतील. मात्र, तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

ग्राहकांना 3 एप्रिलला सेवा मिळणार

1 एप्रिल 2021 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. मात्र, ग्राहकांना आर्थिक वर्षातील पहिला कामकाजाचा दिवस 3 एप्रिल असणार आहे. 1 एप्रिल रोजी बँकांच्या वार्षिक अकाउंट्सचे क्लोजिंग असल्याने ग्राहकांना सेवा मिळणार नाही. 2 एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. 3 तारखेला बँकांचे कामकाज सुरु राहील. त्यानंतर 4 एप्रिल रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. 3 एप्रिल रोजी एक दिवस बँक सुरु असली तरी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने तुमचे काम होण्यास वेळ लागू शकतो.

एप्रिलमध्ये या दिवशी बँका बंद राहणार

एप्रिल महिन्यात 17 दिवस बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. म्हणजेच बँकांना सर्व राज्यात 13 दिवस सुट्टी असेल असे नाही. तेलुगु नववर्ष, गुढीपाडवा, वैशाख, बिजू फेस्टिव्हल आणि उगाडी निमित्त एप्रिलमध्ये बँकांना 13 एप्रिल रोजी सुट्टी राहणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने सुट्टी असेल. त्यानंतर काही राज्यांमध्ये हिमाचल डे, विशु, बंगाली न्यू ईयर, सरहुल यानिमित्ताने 15 एप्रिल रोजी सुट्टी असेल.

21 एप्रिल रोजी रामनवमी आणि 25 एप्रिल रोजी महावीर जयंती निमित्त बँकांना सुट्टी असेल. तसेच सर्व बँकांना 10 आणि 24 एप्रिल रोजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. तर 4, 11, 18 एप्रिल रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.