बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससूनमध्ये 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डी. एस़. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी काल (बुधवारी) अटक केलेल्या महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ आहे.

डी़ एस़ कुलकर्णी यांना आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार अधिकारी, माजी अध्यक्ष आणि चार्टड अकाऊंटंट यांना अटक केली़ त्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात नेण्यात आले होते़ न्यायालयाने २७ जूनपर्यंत सर्वांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले़ त्यानंतर रात्री त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली़ तेथे जेवण घेतल्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास रवींद्र मराठे यांनी आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली़  त्यांच्या वयाचा विचार करता पोलिसांनी तातडीने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले़

रवींद्र मराठे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तपासणीत त्यांचा बी़ पी़ही वाढल्याचे दिसून आले आहे़ आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात येऊन उपचार करण्यात येत असून त्याची

प्रकृती स्थिर असल्याचे ससून रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रविंद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र के. गुप्‍ता, डीएसकेचे सीए सुनिल घाटपांडे, डीएसके यांच्या कंपनीच्या एका विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवासकर , बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष सुशिल मुहनोत (जयपुर) आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे झोन मॅनेजर नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) यांना काल अटक करण्यात आली होती.  न्यायालयाने २७ जूनपर्यंत सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे.