काय सांगता ! होय, 12 वर्षाच्या मुलाची करामत, दहा सेकंदात 10 लाख रुपये ‘लंपास’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या जावद शाखेत दिवसाढवळ्या दहा लाख रुपयांच्या चोरीची घटना समोर आली आहे. 12 वर्षाच्या मुलाने बँकेत प्रवेश केला आणि कॅश काऊंटरवर ठेवलेल्या लाखोंच्या गठ्ठीतील दोन बंडल चोरले, ज्यात दहा लाख रुपये होते. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना मंगळवारी दुपारीची आहे. या घटनेची माहिती बँक व्यवस्थापक लक्ष्मीनारायण मीणा यांना समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले, त्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधले त्यानंतर ते हैराण झाले.

सीसीटीव्हीमध्ये दिसून आले की, एक मुलगा कोणाबरोबर तरी बँकेत आला आहे. अत्यंत चतुराईने, लहान मुलाने कॅश काउंटरच्या मागे पळ काढला आणि तेथे जाऊन दहा लाख रुपये चोरले. यासाठी त्याला 10 सेकंदही लागले नाहीत. बँकेत गर्दी झाल्याने बँक कर्मचारी आपल्या कामात व्यस्त होते. घटनेची माहिती मिळताच जावद पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा तपास सुरू केला. त्याचबरोबर संपूर्ण जिल्हा पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

बँकेचे व्यवस्थापक लक्ष्मी नारायण मीणा म्हणाले की, बँकेचा कॅशियर पैसे ठेवण्यासाठी एक बॉक्स घेण्यासाठी आत गेला. तर एक लहान मुलगा बॅंकेच्या आत शिरला आणि कॅश काउंटर वरून 500 च्या नोटांच्या दोन बंडल उचलून पळ काढला. जेव्हा मुलगा पळाला तेव्हा लोक ओरडले. त्यानंतर जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा असे आढळले की घटनास्थळावरून 10 लाख रुपये गायब आहेत. मुलाने पळ काढला. त्याचप्रमाणे जावद पोलिस स्टेशनचे एसआय आरपी मिश्रा म्हणाले की, बँकेत चोरी झाल्याचे समजले. सीसीटीव्ही पाहिल्यावर उघडकीस आले की, एका मुलाने कॅश काऊंटरच्या मागून घुसून दहा लाख रुपये चोरले होते. परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून मुलाचा शोध सुरू आहे.