‘या’ नामांकित कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीवर भारतात बंदी ; न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसुस स्मार्टफोन कंपनीला न्यायालयाने दणका दिला आहे. टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आसुसवर ट्रेडमार्क Zenच्या वापरासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली न्यायालयाने झेन आणि झेनफोन ट्रेडमार्कबरोबरच फोन आणि लॅपटॉपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नव्हे तर न्यायालयानं Zen आणि ‘Zenfone’ ट्रेडमार्क असलेल्या प्रचारावरही बंदी घातली आहे.

या कारणामुळे विक्रीवर बंदी
तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसने भारतात ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कची नोंदणी केली होती. याअंतर्गत ते फीचर फोन, स्मार्टफोन, टॅबलेट आणि अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणार होते. पण २०१४ मध्ये आसुस कंपनीने ‘Zenfone’ ट्रेडमार्कसह निर्माण केलेले स्मार्टफोन बाजारामध्ये सादर केले. आसुसनं ‘Zenfone’ ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था असल्याचा आरोप टेलिकेअरनं केला आहे. यावर झेनफोन सीरिजचं नाव प्राचीन झेन फिलॉसफीच्या आधारावर ठेवण्यात आला आहे. असे स्पष्टीकरण या आरोपांवर आसुसने दिले आहे.

आसुस कंपनीवर ‘Zenfone’ नावाने किंवा या नावाशी साधर्म्य असणाऱ्या नावाने कोणतंही उपकरण विकण्यास बंदी घालावी यासाठी टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आसुसला दणका दिला आणि ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कच्या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घातली. न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार, २८ मे २०१९ पासून ८ आठवड्यांपर्यंत Zen ब्रँडमध्ये फोन, टॅबलेट, अ‍ॅक्सेसरिजची विक्रीवर तसेच प्रचारावर बंदी राहील.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आसुस कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै २०१९ रोजी होणार आहे.