Pune News : बारामती पोलिसांकडून ‘हनी ट्रॅप’चा पर्दाफाश; बडतर्फ पोलीस, 2 महिलांसह चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महिला दिनानिमित्त (८ मार्च) शहर पोलीस ठाण्याचा चार्ज मिळाल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. बारामती पोलिसांनी हनी ट्रॅपचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एक बडतर्फ पोलीस, दोन महिलांसह चौघांना अटक केली आहे. या टोळीने लाखोंची खंडणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

राकेश रमेश निंबोरे (वय २४, रा. साखरवाडी, ता. फलटण), स्मिता दिलीप गायकवाड (वय २३, रा. फटलण), आशिष अशोक पवार (वय २७, रा. भुईंज, ता. वाई), सुहासिनी अशोक अहिवळे (वय २६, रा. मंगळवार पेठ, फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कमला शंकर पांडे (वय ४५, रा. अशोकनगर, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्मिता गायकवाड या महिलेने फिर्यादी यांच्यासोबत फोनवरून ओळख वाढवली. २७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांना फलटण येथे बोलावून घेतले. तिच्या फ्लॅटवर तिची अनोळखी मैत्रीण आणि आशिष पवार, राकेश निंबोरे ऊर्फ गुरू काकडे यांनी फिर्यादी महिलेला
आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. तसेच पाच लाख रुपये खंडणी मागितली. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन उर्वरित चार लाख रुपये घेण्यासाठी बारामती येथे येणार असल्याचे सांगितले.

घाबरलेल्या फिर्यादी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. जागतिक महिला दिन असल्याने त्या दिवशी महिला पोलीस अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी शेंडगे यांच्याकडे पोलीस ठाण्याचा चार्ज होता. शेंडगे यांनी फिर्यादी महिलेची तक्रार दाखल करून घेत पथक तयार केले. या पथकाने
सापळा रचून बारामती बस स्थानकात आरोपी निंबोरे याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने इतर आरोपींची नावे सांगितले. पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आशिष पवार हा बडतर्फ पोलीस आहे. तो बृहन्मुंबई येथील कुरार पोलीस ठाण्यात होता, तर निंबोरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर लोणंद, फलटण पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत.