IND vs ENG : नववर्षात क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांचे पुनरागमन, मोटेरा-पुण्यात प्रवेश मिळण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या 10 महिन्यांपासून मैदानाबाहेरून क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या भारतीय चाहत्यांसाठी आता एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणाऱ्या दोन टेस्टसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पुण्यात होणा-या वनडे सीरिजसाठीही स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री मिळण्याची आशा आहे. बीसीसीआयने यासाठी प्रयत्न सुरू केले असून दोन्ही क्रिकेट संघांशी चर्चा सुरू केली आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रेक्षकांना स्टेडियममधून मॅच पाहता येईल, असे बीसीसीआयचा वरिष्ठ अधिकारी म्हणाला. त्यामुळे चाहत्यांच्या पुनरागमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

BCCI ने यापूर्वी पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी प्रेक्षकांना स्टेडियममधून मॅच बघता यावी, यासाठी तामीळनाडू क्रिकेट संघाकडे विनंती केली होती. पण त्याला परवानगी मिळण्याची शक्यता नाही. पहिली टेस्ट मॅच 5 फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरू होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अहमदाबाद आणि पुण्याच्या स्टेडियममध्ये दर्शक येऊ शकतील, असा विश्वास BCCI ला आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये शेवटच्या दोन टेस्ट आणि पाच टी-20 मॅच होणार आहेत. तर पुण्यात भारत-इंग्लंडमध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. यासाठी बीसीसीआयने दोन्ही क्रिकेट संघांशी चर्चा सुरू केली आहे. स्टेडियममध्ये किती दर्शकांना परवानगी मिळणार याबाबत अजून स्पष्ट झाले नाही. मोटेरा स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात. जर 50 टक्क्यांपेक्षा कमीची परवानगी मिळाली, तर स्टेडियममध्ये 25-30 हजार लोक येऊ शकतात.

पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी भारत आणि इंग्लंडची टीम चेन्नईमध्ये पोहोचली आहे. दोन्ही टीम सध्या बायो-बबलमध्ये आहेत. भारतीय टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मादेखील बायो-बबलमध्ये गेले आहेत. दोन्ही टीम पाच दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये असतील. मॅचच्या आधी फक्त तीन दिवस दोन्ही टीमना सरावाची संधी मिळणार आहे.