बीड : तरुण शेतकऱ्याची विहरीत उडी मारुन आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

परळी येथील २७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील महादेव दत्तू गित्ते (वय 27) वर्ष या अल्पभूधारक शेती असलेल्या तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तसेच तोंडावर आलेल्या पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे नंदागौळ शिवारातील विहरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. महादेव गित्ते च्या पश्चात पत्नी, एक 3 वर्षाचा मुलगा, अपंग वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. कमावता मुलगा गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.