बीड : बलात्कार पिडीतेला ग्रामपंचायतीनं ठराव करून केलं हद्दपार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरे वेशीवर टांगल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील पाच या गावात समोर आला आहे. सामूहिक बलात्कारातील पीडिता गावकऱ्यांना त्रास देत असून, तिची वागणूक व्यभिचारी असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतने तिच्यासोबत तिच्या कुटूंबाला हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच गावकऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता पोलीस अधीक्षक कार्यालयात ठीय्यादेखील दिला आहे. दरम्यान, या अमानवी घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी गावातील चार नराधमांनी या पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हेच गावकऱ्यांच्या जिव्हारी लागले. तेव्हापासून गावातून पीडित महिलेला त्रास सुरु झाला. जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या महिलेच्या वागणुकीवर संशय घेत २८ डिसेंबरला हाकलण्याचा आणि तडीपार करण्याचा ठराव मंजूर केला.

हे कमी की काय म्हणून सदर महिलेविरुद्ध गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घेतला. पीडितेला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यावेळी जमावाच्या तावडीतून पीडिता आणि तिची मुले कसेबसे जीव वाचवून तावडीतून सुटले. याप्रकरणी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना बोलण्यास नकार दिला. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.