दुर्दैवी ! सेल्फीचा मोह तरुण-तरुणीच्या जीवावर बेतला, नदीपात्रात बुडून मृत्यू

रामनगर (बेळगाव ): पोलीसनामा ऑनलाइन – सेल्फीच्या नादात तरुण- तरुणीचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. गणेशगुडी (ता. जोयडा) येथे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.

पुरुषोत्तम पाटील (22) आणि रक्षिता चिद्री (20 दोघेही रा. बिदर ) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हा बिदर येथील कर्नाटक कॉलेजचा बीएचा विद्यार्थी होता. रक्षिताचे मूळची बिदर येथील असून ती सध्या गुलबर्गा येथील एका महाविद्यालयात शिकत होती. ते दोघे दांडेली येथे फिरण्यासाठी आले होते. सोमवारी रिक्षाने ते गणेशगुडी येथे आले. नदीकाठावर फिरताना त्यांना धरणाजवळ असलेल्या एका पुलावर जाऊन सेल्फी घेण्याचा मोह झाला. यावेळी तोल जाऊन रक्षिता पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पुरुषोत्तमही नदीपात्रात कोसळला. तरुण- तरुणी बुडाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. सोमवारी सायंकाळपासून शोध मोहीम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्यांचे मृतदेह सापडले नाहीत. मंगळवारी फ्लायकॅचर या रिवर राफ्टींग टीमच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पुलाखालून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.