Video : ‘विश्वास ठेवा हे सरकारीच रुग्णालय आहे’, तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी रुग्णालय म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रुग्णालयाची दुरावस्था, रुग्णांची गैरसोय. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसणारं हाय फाय हॉस्पिटल हे सरकारी आहे. तुम्हाला पाहून विश्वासही बसणार नाही. परंतु खरं आहे.

तुकाराम मुंढेंनी त्यांच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ गडचिरोलीतील सरकारी हॉस्पिटलचा आहे. तुम्हाला हे हॉस्पिटल पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण यात दिसणारं सरकारी हॉस्पिटल हे एखाद्या खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसारखं आहे. स्वच्छता, सुविधा आणि तिथलं डेकोरेशन हे भुरळ घालणारं आहे. दीपक सिंगला यांनी केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे हे हॉस्पिटल आहे. यासाठी मुंढेंनी गडचिरोलीच्या सर्व टीमचं अभिनंदन केलं आहे.

गडचिरोलीमधील हे सरकारी रुग्णालय राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एक रोल मॉडेल बनू शकतं. एक सरकारी रुग्णालय कसं असावं, कशा पद्धतीनं नागरिकांच्या मनात सुविधेच्या माध्यमातून घर करावं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

मुंढेंनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.