माफ करा मोदीजी, मी शपथविधी समारंभाला नाही येऊ शकत : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु काही तासांतच ममता बॅनर्जी यांनी त्यांचा निर्णय फिरवला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माफ करा मोदीजी, मी समारंभाला नाही येऊ शकत.

ममतांनी का घेतला युटर्न ?

ममता बॅनर्जी यांनी एक पत्र लिहून मोदींच्या शपथविधीला जाणार नसल्याची महिती दिली. त्या पत्रात ममता लिहितात की, नवे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन. तुमचे शपथविधीचे आमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे माझे नियोजन होते. परंतु गेल्या एका तासापासून भाजप माध्यमांमध्ये असा दावा करत आहे की, बंगालमध्ये ५४ लोकांची राजकीय कारणांमुळे हत्या करण्यात आली.

हे पूर्णपणे चुकीचे आहे. बंगालमध्ये कोणतीही राजकीय हत्या झालेली नाही. कौटुंबिक तसेच वैयक्तिक कारणांमुळे या हत्या झाल्या आहेत. याचा राजकारणाशी काही संबंध नाही. असे आरोप भाजपकडून होत असताना मी शपथविधी समारंभाला उपस्थित राहणे योग्य नाही. माफ करा मोदीजी, मी समारंभाला नाही येऊ शकत.

ममता पुढे म्हणतात की, शपथग्रहण समारंभ हा लोकशाहीच्या उत्सवाचा एक भाग आहे. राजकीय फायदा करून घेण्यासाठी अशा समारंभाचा वापर करणे योग्य नाही. मला माफ करा.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये हिंसेत मृत्यू झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना शपथविधी समारंभाला आमंत्रित केले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या आणि शपथ ग्रहण समारंभाला जाण्याचे रद्द केले.

तिकडे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन सुद्धा मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, नरेंद्र मोदी ३० मेला राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.