बेस्ट कर्मचारी ‘या’ तारखेपासून संपावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –‘बेस्ट’चे ३० हजार कर्मचारी ८ जानेवारीपासून संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या असलेल्या मागण्या या प्रलंबित असल्याने त्या पूर्ण करून घेण्यासाठी  बेस्ट कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसल्याचे दिसत आहे. दरम्यान हा निर्णय असाच नाही घेण्यात आला तर  संपाच्या निर्णयासाठी गुरुवारी बेस्टच्या सर्व आगारांत मतदान झाल्याचे समजत आहे. या मतदानाची आज मतमोजणी झाली. या मतमोजणीत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिल्याने संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
बेस्टच्या सर्व आगारांमध्ये गुरुवारी संपावर जायचे की नाही, यासाठी मतदान घेण्यात आले होते. यात एकूण १५ हजार २११ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. त्यातील ९५ टक्के म्हणजेच, १४ हजार ४६१ मते संप करण्याच्या बाजूने पडली. त्यामुळे आता ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार असल्याचं समजत आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या ?
बेस्ट आणि मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एकाच वेळी जाहीर करावा, २०१६-१७ आणि २०१७-१८मधील बोनसबाबतचा तोडगा तातडीने काढावा या प्रमुख मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्यासाठीच हे संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी थोडक्यात…
– बेस्ट कामगार संघटना पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसणार
– ७ जानेवारी २०१९ च्या मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांचा बेमुदत संप
– ३० हजार कर्मचारी जाणार संपावर
– संप करावा की नाही याबाबत झालेल्या मतदानात ९५ टक्के कर्मचा-यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला
– बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये समाविष्ट करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी तात्काळ                करण्याची मागणी
– नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी, पालिका कर्मचा-यांइतका बोनस मिळावा या       देखील संघटनांच्या मागण्या आहेत.