Pune News : भामा आसखेडचे पाणी पोहचले खराडीत, भाजपकडून ‘जलपूजन’

वडगाव शेरी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेडचे पाणी आज खराडीत पोहचले. भामा आसखेडमधून आलेल्या पाण्याची चाचणी आज (शुक्रवार) घेण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी विमाननगर, खराडी प्रभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाटा गार्डरुम येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पोहचले. भाजपच्या वतीने गंगा आली हो अंगणी म्हणत जलपूजन करुन पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. या भागातील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका श्वेता गलांडे-खोसे, मुक्ता जगताप, स्विकृत सदस्य विशाल साळी, आशा जगताप तसेच मनोज जगताप, विनोद बेंडभर, अब्दुल शेख, अजय वर्पे, सनी वाघमारे इत्यादी उपस्थित होते. या पाण्याने पूर्व भागाची तहान भागेन आणि प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटेल. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या पाठपुराव्यामुळे आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने ही योजना पूर्ण होऊ शकले, असे नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे यांनी यावेळी सांगितले.

भामा आसखेड पाणी कोणत्या राजकीय पक्षाने मंजूर केली, कोणी काम पूर्ण केले यावर श्रेयवादाची लढाई सुरु आहे. कामाचे श्रेय घेण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशावेळी संस्कृतीप्रमाणे अंगणात आलेल्या पाण्याचे भाजपच्या नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थित जलपूजन केले. अनौपचारिकपणे पार पडलेल्या या कार्यक्रमास आजी माजी दोन्ही आमदार उपस्थित नव्हते.

याविषयी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्य भामा आसखेडच्या जलवाहिन्यांच्या चाचण्या सुरु आहेत. तसेच जलवाहिन्या स्वच्छ करण्यात येत असून जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. पाणी खराडीतील टाक्यांपर्यंत पोहचले आहे. अद्याप या जलवाहिन्या आमच्याकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या नाही. आज करण्यात आलेले जलपूजन अनौपचारीक असावे. आम्ही त्यावेळी तिथे उपस्थित नव्हतो.