भारत बंदच्या पार्श्वभुमीवर शहरात 315 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी शहरात काही संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. त्या पार्श्वभुमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणांहून 315 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

केंद्र शासनाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा केल्यानंतर देशभरात आंदोलनाची लाट उसळली आहे. दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी देशासह राज्यभरात विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी आंदोलनासह मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देभरातील विविध संघटनांनी बुधवारी भारत बंदची हाक दिली होती. बंदला पाठिंबा देण्यासाठी शहरातील अनेक संघटनांनी मिळून स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, हडपसर, कोथरुड, कर्वेनगर परिसरासह उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे हिंदुस्थान बंद कालावधीत शहरासह उपनगरांमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली होती.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात बंद शांततेत पार पाडण्यासाठी निवेदन देणार्‍या संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी पोलिसांनी संवाद साधला. त्यानुसार शहरातील 10 ठिकाणांहून 315 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. भारत बंदला पाठिंबा देणार्‍याविरुद्ध सर्वाधिक स्वारगेट परिसरातील 104 तर डेक्कनमध्ये 47 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा