जगात आर्थिक टंचाई भासणार ! 350 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर, जाणून घ्या देशाचे भाकीत

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून यंदा देशाच्या राजची गादी कायम राहणार असली तरी त्याला संकटाने ग्रासले जाणार आहे. जगात आर्थिक टंचाई भासणार आहे. यावर्षी कापूस, ज्वारी, मूग अशी पीके चांगली येतील आणि त्यांना भावही चांगला राहणार आहे. तांदुळ, वाटाणा, जवस, गहू चांगले येईल, पण या पिकांना भाव राहणार नाही, असे या भाकितात म्हटले आहे.

भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खानदेश या ठिकाणाहून हजारो शेतकरी येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे भाकित सांगितले जाते. ३५० वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरु केली होती. त्यांचे वंशज ही परंपरा पुढे चालवत आहेत.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच भेंडवळची घट मांडणी करण्यात आली. त्यानंतर अक्षयतृतीयेला सारंगधर महाराज वाघ यांनी या घट मांडणीतून सांगण्यात आलेले निष्कर्ष पुढे आले आहेत.

या भाकितानुसार यावर्षी जून महिन्यात कमी तर, जुलै महिन्यात पाऊस चांगला होईल. आगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल.  पृथ्वीवर मोठे संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल, देशाच्या राजाची गादी कायम राहणार आहे. मात्र, राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल, असे भेंडवळच्या घट मांडणीत सांगण्यात आले आहे.यावर्षी रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे. कोरोनासारख्या महामारीतून दिलासा मिळण्याचे या वर्षभरात तरी शक्यता नाही.

येत्या हंगामात पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकटे, शत्रुंच्या कारवाया अशा सर्व प्रश्नांबाबत इथं अंदाज  व्यक्त करण्यात येतात. हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी दरवर्षी भेंडवळला जमतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून येथे जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.