‘भीम आर्मी’ प्रमुखांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली

मुंबई : वृत्तसंस्था – मुंबईमध्ये सभा घेण्यासाठी ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीम आर्मीच्या मुंबईतल्या नेत्यांनी मुंबई पोलिसांवर भेदभाव करुन आवाज दडपल्याचा आरोप केला आहे.

यावर भीम आर्मीने आपली प्रतिक्रिया मांडली आहे. आमच्या संघटनेने शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमास विरोध केल्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक आम्हाला परवानगी देत नसल्याचा दावा भीम आर्मीने केला आहे. वरळीतल्या जांबोरी मैदानात तसंच दादरच्या चैत्यभूमी परिसरात भीम आर्मीने  कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी मागितली होती असे समजत आहे.

यानंतर वरळी पोलिसांनी याठिकाणांवरील चंद्रशेखर आझाद यांच्या सभेची परवानगी नाकारली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कारण वरळी पोलिसांकडून देण्यात आले आहे. शिवाय दादर पोलीसांनीही कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्याेच समजत आहे. सुट्टीचा दिवस असल्याने अनुयायांची गर्दी होत असल्याने तिथंही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होत असल्याचं कारण दादर पोलीसांनी दिलं आहे.