भोकर तालुक्यातील धक्कादायक घटना ! युवकाचा धार धार शस्त्राने खून

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – भोकर तालुक्यातील भोसी येथील एका बेपत्ता झालेल्या तरुणाचा ४ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भोकर तालुक्यातील भोसी या गावातील विनायक प्रभाकर देशमुख कल्याणकर वय २९ वर्ष हा तरुण दिनांक ३ जुलै रोजी संध्याकाळी दूध आणण्यासाठी आपल्या शेताकडे गेला होता तेव्हापासून तो घरी परतला नसल्याने चिंतेचे वातावरण होते.

भोकर पोलीस स्टेशन मध्ये सदरील तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती, तरुण बेपत्ता झाल्याचे कळताच गावातील नागरिकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता दिनांक चार जुलै रोजी त्याच्या शेताच्या दोन किलोमीटर दूरवर स्वत:ची मोटरसायकल आढळून आली, त्यामुळे सदरील बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोठे प्रयत्न करण्यात आले, नांदेड वरून श्वान पथकास पाचारण करण्यात आले, तेव्हा सुद्धा तरुणाचा कुठेच ठावठिकाणा आढळून आला नाही, दिनांक ७ जुलै रोजी भोसी शिवारात सकाळी उसाच्या फडात मोठ्या कॅनॉलच्या बाजूस विनय प्रभाकर कल्याणकर (२९) यांचे प्रेत अशोक तुकाराम कल्याणकर यांच्या ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेले होते.

मयत विनय कल्याणकर यांचा मोबाईल कोठे तरी फेकून देण्यात आला होता. याबाबत त्यांचे बंधू अभिजित प्रभाकर कल्याणकर रा.भोसी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.३ जुलैच्या सकाळी १० ते ७ जुुलैच्या सकाळी ७.४० वाजेदरम्यान विनय प्रभाकर कल्याणकरचा कोणी तरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून धार – धार शस्त्राने डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा खून केला. भोकर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, २०१प्रमाणे गुन्हा क्रमांक २८९/२०२० दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक, भोकर विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक ढेढवाल, हे करीत आहेत.

सदरील तरुणाच्या उत्तरीय तपासणीनंतर खरा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, मयत तरुणाची उत्तरीय तपासणी नांदेड येथील सरकारी दवाखान्यात करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.