Pimpri : घरफोड्या करणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या, 10 लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या चौघांना दोन वेगवेगळ्या कारवाईत भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 तोळे सोन्याचे आणि 20 तोळे चांदीच्या दागिन्यासह 10 लाख 39 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

किरण गुरुनाथ राठोड, भगतसिंग भादा असे पहिल्या कारवाईत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दुसऱ्या कारवाईत जयंत गायकवाड उर्फ जयड्या आणि सचिन पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण राठोड आणि भगतसिंग भादा याने दिघी परिसरात चिकन दुकानमालकाच्या गळ्याला कोयता लावून गल्ल्यातील पैसे घेऊन मी भोसरीचा दादा आहे माझ नाव किरण राठोड आहे, मला कोणी नडायचे नाही, असे म्हणत रस्त्यावर दहशत पसरवली होती. याप्रकरणी भोसरी पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हे कर्नाटकात पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून दोन्ही आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.तर दुस-या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली विधाते आणि गोपी यांच्या पथकाने घरफोडीमधील अट्टल गुन्हेगार जयड्याला अटक केली आहे. त्याने आत्तापर्यंत 87 घरफोड्या केल्या असून त्याच्याकडून सोने आणि चांदीचा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. . वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.