महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई ! युरेनियमसह दोघांना अटक, 21 कोटी रुपयांचा साठा जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली असून या दोघांकडे तब्बल सात किलो युरोनियम आढळून आले. अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणारे युरेनियम जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एटीएसने जप्त केलेल्या युरेनियमची किंमत 21 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

युरेनियम खरेदी करण्यासाठी कोणी तयार होत आहे का याचा शोध दोन आरोपी घेत होते. त्यावेळी महाराष्ट्र एटीएसने त्यांच्यावर छापा टाकून युरेनियम जप्त केले आहे. युरेनियम हा दुर्मिळ धातूपैंकी एक आहे. किरणोत्सर्ग करणाऱ्या या धातूचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जातो. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

जप्त केलेले युरेनियम भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. जिगर पांड्या (रा. ठाणे), अबु ताहीर (रा. मानखुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिगर हा युरेनियम विक्रीसाठी नागपाड्यात येणार असल्याची गोपनिय माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून जिगरला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अबु ताहीरने हे युरेनियम दिल्याचे सांगितले. या दोघांकडून 7 किलो 100 ग्रॅम युरेनियम जप्त करण्यात आले आहे. या युरेनियमची आंरराष्ट्रीय बाजारात 21 कोटी 30 लाख रुपये एवढी किंमत आहे. अणु ऊर्जा कायदा 1962 अंतर्गत या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे हा घातक पदार्थ कोठून आला, कोणी दिला, याचा वापर कशासाठी केला जाणार होता ? याचा तपास सुरु आहे. या दोघांनी हा घातक पदार्थ प्रयोगशाळेतील व्यक्तींच्या मदतीनेच आणला असण्याची शक्यता आहे. दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष भालेकर आणि त्यांच्या पथकाने केली.