Cyclone Nisarga : चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगडमध्ये प्रचंड नुकसान

पुणे – निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बुधवारी कोकण किनारपट्टीला बसला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांशी संपर्क साधला असता मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यातील नुकसानीची माहिती कळली. आंबा, नारळ, पोफळी, काजू, फणस, केळी अशी ७० टक्के झाडे निसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडली असा अंदाज आहे. दापोली तालुक्यात सुमारे ७० गांवे आहेत. त्यातील अनेक गावांमधील मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले असे रहिवाशांनी सांगितले. मंडणगड तालुक्यातील २३ गांवे पूर्णपणे बाधित झाली आहेत. या तालुक्यात जंगल असलेला भाग खूप मोठा आहे. तेथील प्राणी, पक्षी यांच्या नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही. दापोली हे निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र बिंदू होते त्यामुळे भयावह वादळ आणि अखंड पाऊस याचा थरारक अनुभव तेथील रहिवाशांनी घेतला. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाचे थैमान चालू होते. सध्याही मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. चक्रीवादळामुळे गुहागर तालुक्यातही झाडे, घरे यांची पडझड झाली त्यामुळे खूपच नुकसान झाल्याचे कळते. रत्नागिरी शहराला मात्र वादळाचा फटका फारसा बसलेला नाही.

सध्या कोरोना साथीचे सावट सर्वत्र असताना चक्रीवादळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी असल्यामुळे दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांमधील नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होईल. राज्यसरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले असल्याने आपल्याला नुकसानभरपाई किती मिळेल? याची शंका असल्याचे बागायतदारांनी सांगितले. गेल्या वर्षीचे निधी अद्यापही मिळाले नाहीत अशा तक्रारी बागायतदारांनी केल्या. यंदा कोरोनाची भिती आणि लॉकडाऊन या कारणांनी जिल्ह्यातील आंब्याला फारसा भाव मिळालेला नाही. आंबा कॅनिंग सेंटर्सकडे पाठवला. पण, वादळामुळे कॅनिंग सेंटर्सच्या कामांवरही परिणाम झालेला आहे. वादळामुळे आंबा, काजू, नारळ, पोफळी, फणस, केळी अशी अनेक मोठी, पूर्ण तयार झाडे जमीनदोस्त झाली. त्यातून पुढील काही वर्षे नुकसान सोसावे लागणार आहे. सद्यस्थितीत आणखी दोन वर्षे तरी बागायतदारांना सावरण्यासाठी लागतील.