Bihar Elections 2020 : बिहारचा कौल कुणाला ?

बिहार : वृत्तसंस्था – बिहारचा कौल कुणाला, याचा आज फैसला होईल. तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली असून, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सत्ताविरुद्ध लाट, तेजस्वी यादव यांची प्रचारात आघाडी, नितीश कुमार यांना मानणारा वर्ग आणि भाजपची राजकीय खेळी या अनुषंगाने झालेल्या निवडणुकीत काही एक्झिट पोलमधून महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, अशी शक्यता वर्तवली आहे, तर एका एक्झिट पोलने एनडीएच्या विजयाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काही एक्झिट पोलने अटीतटीच्या लढाईची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, मतमोजणीनंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत प्राप्त न झाल्यास राजकीय आघाड्यांची फेर मांडणी होऊ शकते. त्यामध्ये चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि इतर छोट्या पक्षांची व अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्याच पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणारी समीकरणे अशी असू शकतात.

लोकजनशक्ती पार्टी आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार
एक्झिट पोलमध्ये आघाडीवर असलेल्या तेजस्वी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला बहुमताला काही तुल्यबळ कमी पडल्यास महाविकास आघाडी चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसोबत इतर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या सह्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करेल.

छोटे पक्ष आणि अपक्षांना सोबत घेऊन नितीश सरकार

बहुमतासाठी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला आवश्यक जागा प्राप्त न झाल्यास आणि महाविकास आघाडीही सत्तेपासून दूर राहिल्यास छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने एनडीए बहुमताच्या आधारे सरकार बनवेल.

लोकजनशक्ती पार्टी आणि अपक्षांच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री

भाजपला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता काही एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली. जर असा निकाल लागून एनडीएला बहुमतासाठी काही जागा कमी पडत असल्यास भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो. तसेच चिराग पासवान यांनी पाठिंब्याच्या बदल्यात भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरल्यास नितीश कुमार यांच्याऐवजी भाजपचा मुख्यमंत्री बनू शकेल.

महाविकास आघाडी आणि नितीश कुमार एकत्र

जेडीयूला कमी जागा भेटल्यास भाजप मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरू शकतो. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा एकदा महाविकास आघाडीस पाठिंबा दर्शवू शकतात. पण त्यात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता धुसर आहे. मात्र, अशा आघाडीची शक्यता कमी आहे.

त्रिशंकू निकाल लागल्यास या पक्षांची लागेल लॉटरी

बिहार निवडणुकीचे चित्र दुपारनंतर स्पष्ट होईल. त्यानंतर त्रिशंकू निकाल लागल्यास चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, जितनराम मांझी यांचा हम व उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोकसमाज पक्ष, मुकेश साहानी यांचा व्हीआयपी त्याचसोबत जनाधिकारी पार्टी या सामान्य जागा जिंकणाऱ्या पक्षाची लॉटरी लागू शकते.