CM नितीश कुमार यांचे ‘हे’ 6 ‘लढवय्ये’, ज्यांच्यावर आहे JDU च्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुख्यमंत्री नितीशकुमार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय लढाई जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून युतीच्या मदतीने सत्तेवर राहण्याचा इतिहास रचणाऱ्या नितीशकुमार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 2015 मध्ये नितीश यांच्यासाठी प्रशांत किशोर यांनी निवडणुकीची रणनीती आखली होती, त्या आधारे नरेंद्र मोदी यांच्या विजयी रथास ते रोखू शकले होते. यावेळी नितीश यांनी कुण्या प्रोफेशनलची मदत घेण्याऐवजी त्यांनी आपल्या खास राजकारण्यांकडे निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.

आरसीपी सिंह

जेडीयूमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा बहुमान असलेले राज्यसभेचे खासदार आरसीपी सिंह हे या निवडणुकीच्या प्रचाराच्या रुपरेषेपासून ते राजकीय समीकरण तयार करण्यापर्यंतचे काम करत आहेत. आरसीपी सिंह यांच्याकडे दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. ते उमेदवारांच्या निवडणुकांपासून ते मित्रपक्षांसह चर्चेपर्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. नितीशकुमार यांच्या सर्वात जवळचे नेते म्हणून ते ओळखले जातात आणि जेडीयूच्या वॉर रूममध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

ललन सिंह

नितीश कुमारचे सर्वात भरवशाचे मानले जाणारे ललन सिंह हे मुंगेर येथून खासदार आहेत. जेडीयूचा भूमीहार चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते आणि नितीश यांचे महायुतीतून वेगळे झाल्यानंतर त्यांची राजकीय भूमिका लक्षणीय वाढली आहे. सध्या नितीश यांचे डोळे व कान म्हणून त्यांना मानले जाते. आरजेडीचे आमदार आणि एमएलसी तोडण्यात आणि ते जेडीयूच्या छावणीत आणण्यात ललन सिंह यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विधानसभा निवडणुकांसाठी नेत्यांची फेरबदल करण्याची आणि एनडीएमधील जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी ते हाताळत आहेत.

अशोक चौधरी

कॉंग्रेसमधून जेडीयूमध्ये आलेले अशोक चौधरी यांनी नितीशकुमार यांचा विश्वास कमी वेळात जिंकण्यात यश मिळवले आहे. दोन दिवसांपूर्वी नितीश यांनी अशोक चौधरी यांच्याकडे बिहार जेडीयूच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ते महादलित समाजातील आहेत आणि त्यांनी कॉंग्रेसमध्ये असताना चार वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव येथे कामी येणार आहे. आभासी मेळाव्यात त्यांनी उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली, यामुळे दलित समाजाला मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.

वशिष्ठ नारायण सिंह

जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह हे पक्षाचे ज्येष्ठ आणि नितीशकुमार यांचे भरवशाचे मानले जातात. जेडीयू कार्यकर्ते त्यांना दादा म्हणतात. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि जेडीयूचे कार्यकर्ते यांच्यात ते पुल म्हणून काम करतात. जेडीयू नेते आणि कार्यकर्ते त्यांची मते वशिष्ठ नारायण सिंह यांच्यामार्गे नितीशकुमार यांच्यापर्यंत पोहोचवतात. बिहारमध्ये जेडीयूच्या सर्व जिल्हा व विधानसभा अध्यक्षांना ते थेट ओळखतात. अशा परिस्थितीत त्यांना निवडणूक प्रचारात संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

संजय झा

जेडीयू नेते संजय झा हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये मोजले जातात. सोशल मीडियामध्ये पक्ष आणि सरकार मजबूत करण्याची जबाबदारी संजय झा यांच्या खांद्यावर आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेडीयूच्या आभासी मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी संजय झा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यंदाच्या निवडणूक प्रचाराबाबत सोशल मीडियाला धार देण्याची जबाबदारी नितीशकुमार यांनी त्यांच्यावर सोपविली आहे. एवढेच नव्हे तर ब्राह्मणांना जेडीयूशी जोडण्याचे कामही त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

विजय चौधरी

जेडीयू नेते विजय चौधरी हे बिहार विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ते नितीश यांचे सर्वात विश्वासार्ह मानले जातात, ज्यामुळे त्यांना 2015 मध्ये स्पीकरची जबाबदारी देण्यात आली होती. विजय चौधरी प्रसिद्धीऐवजी पडद्यामागे शांततेने काम करतात. त्यांना नितीशकुमार यांचे निवडणूक चाणक्य मानले जाते आणि जीतन राम मांझी यांना जेडीयूमध्ये आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्यांना बिहारचे राजकारण अधिक चांगले समजते आणि ते जातीय राजकारणाचे खिलाडी मानले जातात.