संजय राऊत यांना बिहारच्या पोलिस महासंचालकांनी दिलं उत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांचे यामध्ये नाव येऊ लागल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा मैदानात उतरले आहेत. बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपल्यावर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा राऊत यांनी ‘रोखठोक’ या सदरातून समाचार घेतला. दरम्यान, राऊत यांच्या टीकेला पांडे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

गुप्तेश्वर पांडे म्हणाले, “आयुष्यभर निष्पक्ष राहून निष्ठेने सर्वसामान्य नागरिकांची सेवा केली. माझ्यावर खूप सारे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. ज्याचं उत्तर देणं योग्य ठरणार नाही. परमेश्वर प्रत्येकाचं रक्षण चांगल्या पद्धतीने करतो. हवा पण वाहत राहते, दिवा पण जळत राहतो. मला जितक्या हव्यात तितक्या शिव्या द्या, पण सुशांतला न्याय मिळवून द्या” असे पांडे यांनी ट्विट केलं आहे.

काय म्हटलं होत संजय राऊत यांनी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी होत मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोलतात. हा सरळसरळ पोलिसी शिस्तभंग आहे. पुन्हा या गुप्तेश्वर पांडे यांच्याकडून शिस्त पाळण्याची अपेक्षा तरी का करावी? हे गुप्तेश्वर पांडे कोण? २००९ साली ते डीआयजी असताना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन थेट राजकारण उतरले. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ‘बक्सर’ मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले. पण भाजपचे खासदार लालमुनी चौबे यांनी बंडखोरी करण्याची धमकी देताच गुप्तेश्वर पांडे मधल्या मध्येच लटकले. ‘ना घर के ना घाट के’ अशी त्यांची अस्वस्था झाली. अशा तऱ्हेने राजकारणात घुसण्याचे त्यांचे मिशन फेल गेले.

त्यानंतर त्यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी अर्ज विनंत्या केल्या. असे सांगतात की, गुप्तेश्वर पांडे यांच्या पत्नीनेही पतीच्या वतीने सरकारकडे अर्ज केला व नोकरी सोडताना आपल्या पतीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगितले. याच आधारावर त्यांना पुन्हा सेवेत घेतले असेल तर तो बिहार सरकारचा प्रश्न. पांडे हे तेव्हा भाजपच्या तंबूत होते व आज नितीश कुमार यांचे खास आहेत. भाजपकडून उमेदवारी स्वीकारलेले पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे हास्यास्पद आहे. पांडे बिहारमधून शहापूर मतदारसंघातून उद्याची विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत. या भागातील जातीय समीकरणांचा पांडे यांना लाभ होऊ शकतो. अद्यापि त्यांचा सेवकाळाला सहा महिने बाकी आहे. मात्र ते राजीनामा देऊ शकतात आणि जदयुच्या तिकिटावर बक्सर सदर किंवा शहापूर विधासनसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असे बातम्यात सांगितले जाते. अशा पोलिसांकडून समाजाने काय अपेक्षा ठेवायची? असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले होते.