अपत्य प्राप्तीसाठी कैद्याला मिळाली 15 दिवसांची सुट्टी, लग्नाच्या 6 महिन्यानंतर लागली होती जन्मठेपेची शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला बिहार उच्च न्यायालयाने अपत्य जन्माला घालण्यासाठी 15 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला आहे. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात तो हत्येप्रकरणी तुरुगांत गेला होता. दरम्यान कैद्याच्या पत्नीने हायकोर्टात अपत्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश दिला आहे. कोर्टाच्या या आदेशामुळे दोघे पती- पत्नी आनंदी आहेत. ही अनोखी घटना बिहारच्या शरीफ तुरुंगातील आहे.

विक्की कुमार (रा. उतरनावा, नालंदा) असे या कैद्याचे नाव आहे. विक्कीला 2012 मध्ये एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तेंव्हापासून तो बिहारच्या शरीफ तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तुरूंगाचे विजिटर देवेंद्र शर्मा अधिवक्ता यांच्या सल्ल्याने विक्कीची पत्नी रंजीता पटेलने हायकोर्टात अपत्यासाठी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करत हायकोर्टाने अपत्य जन्माला घालण्यासाठी 15 दिवसाच्या पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला आहे. तसेच या प्रकरणात देवेंद्र शर्मा यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच मिळालेल्या आदेशामुळे विक्की कुमार आणि त्याची पत्नी आनंदी आहे. याबाबत देवेंद्र शर्मा म्हणाले की, विक्की कुमार लग्नाच्या 6 महिन्यानंतर हत्येप्रकरणी तुरूंगात गेला होता. तुरूंगात भेटीदरम्यान विक्कीने त्यांना त्याची व्यथा सांगितली होती. यानंतर शर्माच्या सल्ल्यावर पत्नीने याचिका दाखल केली होती. त्यानुसार हायकोर्टाने विक्की कुमारला अपत्य प्राप्तीसाठी पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला आहे.