काय सांगता ! होय, एका Bitcoin ची किंमत पोहचली 47 लाखांवर, गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगातील सर्वाधिक लोकप्रिय आभासी चलन असलेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने कोरोना संकटात विक्रमी घोडदौड कायम ठेवली आहे. बिटकॉईनने या यापूर्वीच्या किंमतीचे सर्व रेकार्ड मोडले आहेत. मंगळवारी (दि.13) एका बिटकॉईनची किंमत 62,575 डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास 47 लाखांवर गेली आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत. केवळ एकाच वर्षापूर्वी एका बिटकॉईनची किंमत साडेतीन लाखाच्या जवळपास होती. आता त्यात जवळपास 13 पट वाढ झाली आहे. आर्थिक अनिश्चितता आणि कोरोनाचा कहर लक्षात घेता लवकरच बिटकॉइन गुंतवणूकदारांना कोट्याधीश करेल, असे अंदाज जाणकारांनी व्यक्त केले आहेत.

कोरोनाच्या काळात जागतिक अर्थव्यवसस्थेत मंदी असताना बिटकॉईनची किंमत मात्र सातत्याने वाढत आहे. सोने दरात होत असलेली घसरण आणि अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मार्ग बिटकॉईनकडे वळवला आहे. त्यामुळे बिटकॉइनने गगन भरारी घेतली आहे. आता एका बिटकॉईनची किंमत तब्बल 47 लाख रुपयांवर गेली आहे. या काळात जगातल्या अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे. टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वधिक श्रीमंत असलेल्या इलॉन मस्कनेही यात 1.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर बिटकॉईनचे मूल्य प्रंचड वेगाने वाढल्याचे बोलले जात आहे. तसेच बीएनवाय मेलन, मास्टरकार्ड या कंपन्यांनीही बिटकॉईनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारांना देखील बिटकॉइनची भुरळ घातल्याने या आभासी चलनाने विक्रमी स्तर गाठला आहे. दरम्यान जगामध्ये अनेक देश बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करत असताना भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही.