भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांची नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  नुकतेच भाजपमध्ये घरवापसी केलेले नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपात घरवापसी केल्याने त्यांना पद काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावर आज सानपांना भाजपाने दुसऱ्या क्रमांकाचे मानाचे पान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी आमदार सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव झाला. त्यामुळे ते राष्ट्रवादीचा उंबरा सोडून शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या येण्याची उपयोगिता सिद्ध न होऊ शकल्याने शिवसेनेतही ते अडगळीतच होते; यामुळे सानपांनी पुन्हा भाजपात जाणे पसंत केले होते.