Atul Bhatkhalkar : ‘बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरुन करतंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यातच राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता इतर राज्यांतून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे शनिवारी केली. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरुन करतंय, असा टोला भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारला लगावला. अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे कांदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातल बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामाना ट्विटर आणि फेसबुकवरुन करत आहे, असं भातखळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर विकण्यास 16 कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा अन्यथा माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.