देवेंद्र फडणवीसांची CM ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका ! भर सभेत संतापून म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाइन – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नव्या कृषी कायद्यांवरून मोदी सरकार (Modi Government) ची बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री (DCM Ajit Pawar) अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या एका महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. अशात आता भाजपकडून मात्र संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील मांजरी बुद्रूक येथे यात्रेत संबोधित करताना फडणवीसांनी नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगितले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायलाही तयार नाही’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारमध्ये शेतकऱ्यांसदर्भात बोलणारं कुणी नाही. शेतकऱ्यांचा विचार करणारं कुणी नाही. 5 वर्ष सातत्यानं आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग अशा प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आलं तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायलाही तयार नाही. शेतकऱ्याचा साधा विचारही केला जात नाही.

‘आमचे अजितदादा पवार त्याहूनही वर निघाले…’

पुढं बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या घोषणा करत शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तिथं जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि कमी पैसे देताय असं सांगत हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे असं जाहीर केलं. कोरडवाहू आहेत त्याना 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यायचं असं सांगितलं. आमचे अजितदादा पवार त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही 50 हजार म्हणता, बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण कसले दीड लाख आणि पन्नास हजार. राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला अशी परिस्थिती आहे.

‘शेतकऱ्याला मुर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं’

संताप व्यक्त करत फडणवीस म्हणाले, आमच्या शेतकऱ्यांना 6 आणि 8 हजार रुपये घोषित केले आणि ते देखील पोहोचले नाहीत. शेतकऱ्याला मुर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

‘आज शेतकऱ्यांसाठी एकही योजना नाही’

फडणवीस असंही म्हणाले, आमच्या कर्जमाफीच्या नावावर नावं ठेवत त्यांनी घोषणा केली. आमची कर्जमाफीची योजना संपलीच नव्हती. आम्ही निवडणूक झाल्यावर पुन्हा सुरू करू असं सांगितलं होतं. आमच्या योजनेत 42 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. यांच्या योजनेत फक्त 29 लाख शेतकऱ्यांना झाला. आज शेतकऱ्यांसाठी एकही योजना नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.