गांधीनगर : वृत्त संस्था – सूरतचे भाजप अध्यक्ष नीरज झांझमेरा आणि पक्षातील अन्य नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून आयटी सेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. परिणामी, या अटकेविरोधात आघाडी उघडली असून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपमधील अनेक नेते या अटकेमुळे नाराज आहेत. नितेश वनानी असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते सूरतमध्ये भाजपच्या आयटी सेलमध्ये काम करायचे.
सूरत सायबर क्राईम ब्रांचचे निरीक्षक प्रशांत खोखरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश यांनी राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या. त्यामुळे त्या नेत्यांची प्रतिमा मलीन झाली. या पोस्ट १९ वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आल्या. ही सगळी अकाऊंट बोगस आहेत. या पोस्ट १२ कॉम्प्युटर्सवरून व्हायरल करण्यात आल्या. यामुळे नितेश वनानी यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विभाभाई चोसला (सूरत, पलसाणा) यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी एफआयआरची दाखल घेत नितेश यांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. अश्लिल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणं, गुन्हेगारी कारस्थान रचणं, दंगल पसरवण्याची हेतूनं विधान करणं, शांततेचा भंग करणं, यासारखे गुन्हे नितेश यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.
नितेश यांच्या अटकेविरोधात सूरतमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते एकवटले आहेत. सूरत शहरातील ६ वॉर्ड अध्यक्ष, ४ महामंत्री यांचा यामध्ये समावेश आहे. यातील अनेकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सूरत भाजपमधील काही नेत्यांच्या इशाऱ्यावरून नितेश यांना अटक झाल्याचा आरोप या नेत्यांपैकी अनेकांनी केला आहे. कॉमर्समध्ये पदवी मिळवलेले नितेश रियल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतात. ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत.