भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याला अन् शिवसेनेच्या खासदारास कोरोनाची लागण

मुंबई, ता. १५: पोलीसनामा ऑनलाइन : गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी कोरोनाचा अधिक संसर्ग पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे आणि आता अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत रात्री उशिरा ट्विटरद्वारे आशिष शेलार यांनी कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. “माझी कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

 

 

 

 

याशिवाय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. “आज पुन्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ” याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी १ मार्च रोजी पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.