गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ ?, नव्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

जामनेर : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील ((BHR) घोटाळा सध्या चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे जामनेरचे आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) यांनी केला आहे. मात्र, जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी गिरीश महाजन यांनी दोन दिवसापूर्वी पत्नी साधना महाजन यांच्या नावावर 25 कोटीची मालमत्ता कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा आरोप करत ठी खळबळ उडवून दिली आहे. यामुळे महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी रविवारी (दि. 20) सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत थेट आरोप केले. ते म्हणाले, गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांच्या नावे दोन दिवसांपूर्वी सुमारे 25 कोटींची मालमत्ता अवघ्या दीड कोटी रुपयांत खरेदी केली आहे. पत्नीच्या नावे कवडीमोल भावाने मालमत्ता घेणारे महाज यांचा बीएचआरशी संबध कसा असू शकत नाही, असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ललवानी यांनी केली आहे.

शिक्षणसंस्था हडपण्याचाही महाजनांचा कट होता : ललवानी यांचा आरोप
जळगावातील मोठी शैक्षणीक संस्था हडपण्यासाठी महाजन यांनी मोठा कट रचला. आपल्या राजकीय विरोधकांविरुद्ध खोटी गुन्हे दाखल करत त्यांचा छळ केल्याचा आरोप ललवाणी यांनी महाजन यांच्यावर केला आहे .तसेच जामनेर नगरपालिकेत झालेल्या अनेक गैरव्यवहारांमागे देखील महाजन यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप करून ललवाणी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

… या मागे कुणी तरी ‘कलाकार’ असल्याचा आ. महाजनांचा आरोप
जळगाव शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादावरून केलेले सर्व आरोप आ. गिरीश महाजन यांनी खोडून काढले आहेत. या वादाशी आपला काडीचा संबंध नसताना आपल्यावर अतिशय संशयास्पद पद्धतीने रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्थानकात दाखल केलेला गुन्हा हा गंभीर प्रकार असून या मागे कुणी तरी ‘कलाकार’ असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.