शिवसेनेला शेतीतलं काय कळतं ? फक्त मोदींना विरोध करण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा, नीलेश राणेंचे टीकास्त्र

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शेती हा शिवसेनेचा विषयच नाही. त्यांना शेतीमधील काय कळतं? शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध दर्शवायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याची टीका माजी खासदार आणि भाजपचे नेते नीलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी केली आहे.

मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. 8) भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत बोलताना राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना हा प्रचंड गोंधळलेला पक्ष आहे. या पक्षाचा उतरता काळ सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांची पतही घसरू लागली आहे. दिल्लीतही शिवसेनेला कुणी किंमत देत नाही. अलीकडच्या काळात कोणत्या एका भूमिकेवर शिवसेना ठाम राहिल्याचे दिसून आलेले नाही. एक दिवस महाराष्ट्राची जनताच त्यांची दखल घेणे बंद करेल. त्यानंतर शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल, असेही राणे यांनी म्हटले आहे.

पवारांनी दहा वर्षांपूर्वीच केली होती मागणी – राणे

कृषी कायद्यांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी शरद पवार यांनी दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्येच केली होती. त्यामुळे आता ते या कायद्यांना का विरोध करत आहेत ते अनाकलनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा आणला म्हणून या कायद्याला विरोध दर्शवला जातो आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधात तीव्रता जास्त आहे. इतर कोणत्याही राज्यात अशी परिस्थिती नाही, असेही नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांनी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह सगळ्या प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, 2010 मध्ये शरद पवारांनी लिहिलेले पत्र दाखवून भाजपने त्यांना त्यांच्या मागण्यांची आठवण करून दिली आहे.