भाजपा नेते नीतेश राणे यांचा सवाल; म्हणाले – ‘CM ठाकरे अन् शिवसेना नेत्यांना सचिन वाझेंची वकिली का करावी लागते?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. दरम्यान वाझे प्रकरणावरून भाजपा नेते नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नीतेश राणे म्हणाले की, आता राज्यात जे काही प्रकरण गाजत आहे, त्यात एक साधा एपीआय जेंव्हा एवढ मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री अन् शिवसेनेचे नेते उतरतात. तेंव्हा या सगळ्याची काही कारण आहेत. नेमकं त्याचीच वकिली यांना का करावी लागते? याचे काही विषय माझ्याकडे असून ते आपल्यासमोर मांडायचे असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी आयपीएलची मालिका खेळवली गेली. त्यावेळी आयपीएलच्या अगोदर मुंबईतील बेटिंगवाल्यांना सचिन वाझेंनी फोन करून तुमची सर्व माहिती माझ्याकडे आहे, कारवाई नको असेल तर 150 कोटी द्या नाही तर छापे मारणार अशी धमकी दिली होती. वाझेनी ही रक्कम बेटिंगवाल्याकडे मागितल्याची माहिती आमच्याकडे आहे. वाझेनी ही रक्कम मागितल्यानंतर त्याला आणखी एकाचा फोन जातो अन् त्याच्याकडून आपल्या वाट्याची मागणी होते. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून वरूण सरदेसाई आहे. सरदेसाई आणि वाझे यांच्यातील जे संभाषण आहे, ते महत्वाचे असल्याचे राणे म्हणाले.