‘उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा वादळापूर्वीची शांतता असू शकते !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेला स्वबळाचा नारा वादळापूर्वीची शांतता असू शकते असं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलं आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद (Babri Masjid) पाडल्यांतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वानं सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी संगळी तत्वं गुंडाळून ठेवली आहेत.”

केंद्र सरकारवर सातत्यानं होणाऱ्या टीकेवरूनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. विखे पाटील म्हणाले, “केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वत:चं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. जर तुमच्या राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता ?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज रहा असे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत रात्री उशीरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात आलेली ही बैठक तब्बल 3 तास सुरू होती.