बंगालमध्ये मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने सलग तिस-यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि केलेले दावे यांच्या तुलनेत त्यांना मिळालेल्या 77 जागा म्हणजे फारच कमी आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांचा करिश्मा संपल्याचे आणि भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपला पश्चिम बंगालमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाले होते. त्यानंतर बंगालमध्ये भाजपला विधानसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पडत होते. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी बंगालवर लक्ष केंद्रीत केले होते. टीएमसीमधून अनेक नेत्यांना भाजपात आणले. मात्र एवढे करूनही भाजपाला जेमतेम 80 जागाही जिंकता आल्या नाहीत. मात्र 2011 आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी आहे. निवडणुकीत भाजपाला 75 च्या आसपास जागा आणि 37 टक्के मते मिळाली आहेत. दुसरीकडे एकेकाळी बंगालमध्ये दीर्घकाळ सत्तेत राहणारे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.

दरम्यान आसाममध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे. याठिकाणी एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती भाजपच्या पथ्यावर पडली आहे. दुसरीकडे केरळमध्ये भाजपाचा करिश्मा चालला नाही. मात्र तामिळनाडूमध्ये कमल हसन सारख्या प्रसिद्ध अभिनेत्याचा भाजप उमेदवाराने पराभव केला. तर पाँडेचेरीमध्ये काँग्रेसचे आव्हान मोडून काढत एनडीए सत्तेवर आली आहे. तसेच देशातील विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकापैकी, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपाचा बंगालमध्ये पराभव झालातरी मोदी-शाहांचा करिश्मा ओसरला असे म्हणता येणार नाही, मात्र पश्चिम बंगालच्या निकालांनी तगडा प्रतिस्पर्धी असेल तर मोदी-शाहांना रोखता येऊ शकते हे मात्र दाखवून दिले आहे.