भाजप नेत्याचं ‘कोरोना’ला ‘आव्हान’, म्हणाले – ‘अरे दम असेल तर घुसून दाखव’

गाझियाबाद : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना, त्या रोगाने आता भारतातही प्रवेश केला आहे. कोरोनाचा देशातील वाढता प्रभाव पाहून केंद्र आणि राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. त्यातच लोनी (उत्तरप्रदेश) येथील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जन यांनी चक्क कोरोना व्हायरसला आव्हान  केले आहे. हिम्मत असेल तर कोरोनाने लोनी मध्ये शिरकाव करूनच दाखवावा असे आव्हान त्यांनी केले आहे. नंदकिशोर गुर्जर यांनी फोनवर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हे आव्हान केले आहे.

लोनी मध्ये रामराज्य असून, येथे ९ गोशाळा आहेत. जगात कोणत्याही ठिकाणी गायीचा वास असतो तिथे कोरोनाच काय, कोणताच व्हायरस प्रवेश करू शकत नाही. कोणताच व्हायरस मग तो मनुष्यरूपात जरी असला आणि त्याने इथल्या नागरिकांना त्रास दिला किंवा मारण्याचा प्रयत्न केला आणि कोणत्याही प्रकारचा आजार पसरविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला ठीक करू शकतो. लोनी मध्ये कोणताच व्हायरस पसरणार नाही आणि आम्ही त्याला टिकून देणार नाही.

उत्तरप्रदेशात सुद्धा राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. या आधी सुद्धा आसाम मधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनी गायीच्या गोमूत्र आणि शेणाने कोरोना व्हायरस वर मात करता येऊ शकते असा दावा केला होता.